ज्योती नगर येथे मॉर्निंगवॉकला जाणाऱ्या वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावले; शहरात पुन्हा मंगळसूत्र चोर सक्रिय; महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Foto
औरंगाबाद : शहरात पुन्हा मंगळसूत्र चोरटे सक्रिय झाले आहे. सकाळी मॉर्निंग वॉक ला गेलेल्या ५७ वर्षीय महिलेचे दुचाकीवरून आलेल्या चोरट्यानी सव्वा लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढल्याची घटना ज्योतीनगर भागात घडली.

शारदा राजकुमार चंदानी वय-५७ (रा.अयोध्या अपार्टमेंट,ज्योतीनगर) या सकाळी नित्यप्रमाणे मॉर्निंग वॉक ला गेल्या होत्या. घरापासून काही अंतरावर जाताच एका मोटारसायकल वरून आलेल्या दोन चोरट्यानी त्यांच्या जवळ येताच दुचाकीची गती कमी केली, महिलेला काही समजण्याच्या आतच चोरट्यानी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले व पोबारा केला. महिलेने आरडाओरड केल्या नंतर नागरिकांनी धाव घेतली मात्र तो पर्यंत चोरटे पसार झाले होते.या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात  अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सानप करीत आहेत.

महिलांमध्ये भीतीचे वातावरण... 
उस्मानपुरा येथील ज्योतीनगर भागात सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात महिला वृद्ध  शतपावलीसाठी जात असतात. या भागात या पूर्वी देखील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याने घटना बंद झाल्या. परंतु, पुन्हा मंगळसूत्र हिसकवल्याने परिसरातील महिलामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी सकाळ संध्याकाळ पोलीस गस्त ठेवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.